लहान मुलांच्या आरोग्यासठी हे आवश्य करा

 जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिम 27 फेब्रुवारीला


एक लाख 72 हजार बालकांचे होणार लसीकरण



अमरावती- जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिम 27 फेब्रुवारीला आयोजिण्यात आली असून, वय पाच वर्षांपर्यंतच्या 1 लाख 72 हजार 319  बालकांचे लसीकरण होणार असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

या दिवशी पालकांनी आपल्या बालकांना न चुकता जवळच्या बुथवर डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अंगणवाडी, शाळा, बसस्थानक, रेल्वे स्थानक, टोलनाके, सर्व रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे या सर्व ठिकाणी बुथ उघडण्यात येणार आहेत. मोहिमेत 2 हजार 28 बुथ व 4 हजार 898 मनुष्यबळाचे नियोजन आहे. मोहिमेत 426 पर्यवेक्षक, 227 ट्रान्झिट टीम, 167 मोबाईल टीम निश्चित करण्यात आल्या असून, 3 हजार 297 घरभेटींचे नियोजन आहे, अशी माहिती डॉ. रणमले यांनी दिली.

आशा सेविकांमार्फत घरोघर स्लिपवाटप

मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी व लाभार्थ्यांना बूथवर नाव शोधण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून आशा सेविकांमार्फत घरोघरी स्लिप वाटप करण्यात येत आहे. मोहिमेपासून कुणीही पात्र बालक वंचित राहू नये म्हणून ग्रामीण भागात 2 ते 4 मार्चदरम्यान व शहरी भागात 2 ते 6 मार्चदरम्यान घरोघरी सर्वेक्षण करून पात्र बालकांना डोस देण्यात येणार आहे, असे डॉ. रणमले म्हणाले.

बाळ नुकतेच जन्मलेले असेल तरीही, यापूर्वी डोस दिला असेल तरीही डोस देणे आवश्यक आहे. बाळ आजारी असल्यास वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार डोस द्यावा. पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रणमले, डॉ. रेवती साबळे, डॉ. विनोद करंजेकर आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments