अमरावती- उन्हाळा लक्षात घेता टंचाई निवारणाची कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
भातकुली तालुक्यातील पाणी टंचाई आढावा सभा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार रवी राणा, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सरपंच व ग्रामसचिवांशी संवाद साधून प्रत्येक गावाची मागणी जाणून घेतली.
'जलजीवन'मध्ये १०५ गावे
जलजीवन मिशनमध्ये तालुक्यातील १०५ गावे समाविष्ट आहेत. या कामांना गती द्यावी. निंदोडी येथे हातपंप, वायगाव येथे वाढीव जलवाहिनी, वाठोडा शुक्लेश्वर येथे हातपंप, रामा येथे वाढीव जलवाहिनी व हातपंप, पूर्णानगर येथे हातपंप, पाटोदा हिंमतपुर येथे वाढीव वाहिनी व हातपंप, निरुळ गंगामाई येथे हातपंप, आंचलवाडी येथे दोन हातपंप, सोनारखेडा येथे पाण्याची टाकी, कामनापूर येथे पाच हातपंप, देवरी येथे टाकी व हातपंप, जळका हिरापूर येथे आवश्यक जलवाहिनी, दगडागड येथे नियमित पुरवठा, वाकी रायपूर येथे हातपंप, विरशी येथे दोन हातपंप, टाकरखेडा संभु येथे पाण्याची टाकी, हातपंप यासह अनेक गावांत पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
'विश्रोळी'बाबत सर्वेक्षण करा
'विश्रोळी' प्रकल्पाचे पाणी अनेक ठिकाणी पोहोचत नाही, अशी तक्रार आहे. याबाबत तत्काळ सर्वेक्षण करावे व अडचणी दूर करण्यासाठी भरीव उपाययोजना करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बोरखेडी येथे गढूळ पाणी येते. शहानूरचे पाणी सोडले जात नाही. बोअरवेलचे पाणी पुरवले जाते, अशी तक्रार आहे. तिथे आवश्यक उपाययोजना तत्काळ करावी. त्याचप्रमाणे, पाणी सोडण्याचे वेळापत्रक ग्रामीण नागरिकांच्या सोयीनुसार असावे. स्थानिकांच्या मागणी लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रस्ता फोडला तर दुरुस्ती लगेच करा
वाहिनी टाकताना रस्ता फोडला तर त्याची तत्काळ दुरुस्ती यंत्रणेने करून द्यावी. रस्ते फोडून दुरुस्ती न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना १ कोटी ७० हजार रुपये कर्ज वितरण भातकुली तालुक्यातील सात गटांना पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. बैठकीला महसूल, पंचायत समिती, जीवन प्राधिकरण आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments