काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यांची मागणी
अमरावती- समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारतो? समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजसुद्धा नसते, असे अश्लाघ्य वक्तव्य करणार्या भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने राज्यपाल पदावरून ताबडतोब बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर यांनी केली आहे.समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचे स्थान काय? हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा प्रश्न मराठी माणसाच्या पायाची आग मस्तकापर्यंत पोहोचवणारा आहे. समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते, असे म्हणणार्या राज्यपालांनी नेमका कोणता इतिहास वाचला आहे ? असा सवालही अॅड. दिलीप एडतकर यांनी उपस्थित केला आहे. चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, अशी मुक्ताफळेही राज्यपाल कोश्यारी यांनी उधळली आहेत. औरंगाबाद शहरात आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात राज्यपालांनी तोडलेले तारे अत्यंत निषेधार्ह आहे. शिवरायांचा तसेच महाराष्ट्राचा अवमान करणारी भाषा मराठी माणूस खपवून घेणार नाही, असा इशाराही दिलीप एडतकर यांनी दिला आहे.
शिवरायांच्या गुरु त्यांच्या मातोश्री जिजाऊच होत्या. शिवरायांनी कधीही रामदासांना आपला गुरु मानले नाही किंवा आयुष्यात कधी शिवरायांची आणि रामदासांची भेटसुद्धा झाली नाही. असे असताना रामदास स्वामींना बळजबरीने शिवरायांचा गुरु ठरवण्याचा विडा काही लोकांनी उचललेला आहे. इतिहासाचे हे विकृतीकरण निषेधार्ह आहे. रामदास स्वामी, महाराजांच्या राज्यात निवास करणारे केवळ गोसावी तेवढे होते. एखाद्या गोसाव्याला गुरु मानण्याएवढी वाईट परिस्थिती शिवरायांवर कधीच आलेली नव्हती. स्वतःचा संसार थाटण्यास ‘असमर्थ’ ठरलेल्या रामदासांना ज्यांना समर्थ म्हणावयाचे त्यांनी खुशाल म्हणावे; परंतु ते शिवरायांचे गुरु होते, असे म्हणण्याचा प्रमाद कोणीही करू नये, असा इशारा एडतकर यांनी दिला आहे. इतिहासाला विद्रूप करण्याची मोहीम काही घटकांनी चालवली आहे. शिवराय स्वराज्याच्या चाव्या रामदास यांच्या सुपूर्त करण्यास गेले होते; परंतु रामदासांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला, असा जावईशोधही राज्यपालांनी आपल्या भाषणात लावला. शिवरायांनी रामदासांना साधी माधुकरी ही वाढली नाही, तेथे ते लोकांचे राज्य एका गोसाव्याच्या सुपूर्त करतील का? असा प्रश्न राज्यपालांनी आता स्वतःच स्वतःला विचारला पाहिजे, असेही एडतकर यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवरायांसोबतच संभाजी राजेंना स्वराज्यरक्षक म्हणण्याऐवजी धर्मवीर म्हणून त्यांना मर्यादित करण्याचा प्रयत्न इतिहासाचे विद्रुपीकरण आहे. राज्यपालांनी शिवरायांना कमी लेखण्याचा आगाऊपणा केल्यामुळे केंद्र सरकारने त्यांना विनाविलंब बरखास्त करावे, अशी मागणी दिलीप एडतकर यांनी केली आहे.
0 Comments