कठीण प्रसंगी आरोग्य पथकाच्या तत्परतेमुळे वाचले महिलेचे प्राण
साद्राबाडी पथकाची कामगिरी
अमरावती- मातेचे हिमोग्लोबिन केवळ 6.4 टक्के, सिझेरियनची आवश्यकता, समुपदेशन करूनही रुग्ण व नातेवाईक अमरावतीला जायला तयार नाहीत, आवश्यक रक्ताची उपलब्धता नाही….अशा कठीण प्रसंगी साद्राबाडीच्या आरोग्य पथकाने तत्परता दाखवून खांडव्याहून रक्त मिळवले व धारणी येथे महिलेची यशस्वी प्रसुती होऊ शकली.
मेळघाटात धारणी तालुक्यातील साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढोमणाढाणा गावातील सुषमा दहिकर या मातेला प्रसुती वेदना कमी प्रमाणात सुरु झाल्याबरोबर साद्रावाडी पीएचसी येथे भरती करण्यात आले. तथापि, मातेचे हिमोग्लोबिन 6.4 टक्के एवढे होते. त्यामुळे तिला धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. या गरोदर मातेची जेव्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांना सिझेरियन शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यांनी अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती करावे लागेल हे मातेला व नातेवाईकांना सांगितले .परंतु माता व रुग्ण अमरावती येथे जाण्यास तयार नव्हते संपूर्ण आरोग्य पथकाने समुपदेशनाचा प्रयत्न केला. त्यात "ब " पॉजिटिव्ह रक्तगटाचे रक्तही उपलब्ध नव्हते. हे लक्षात येताच समुपदेशक ममता सोनकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी दवाखान्यातून रक्त उपलब्ध करून देण्याविषयी विनंती केली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
समुपदेशक ममता सोनकर व सहकारी फुलवंती यांनी ही बाब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहम उघडे यांना कळवली.
सर्वांनी तत्परता दाखवत रक्तासाठी खांडवा गाठण्याचा निर्णय घेतला. समुपदेशक फुलवंती कास्देकर, वाहनचालक गजूभाऊ शनवारे व आरोग्य सेवक सावन जावरकर यांच्या टीमने रक्तासाठी धारणीपासून 90 कि. मी. खंडवा येथे जाण्याचे ठरवले व त्यांनी रात्री आठ वाजता खांडवा गाठले व रक्ताच्या दोन पिशव्या घेऊन धारणीला आले. सर्जन डॉ रेखा गजलवार,डॉ. हेमंत ठुसे व डॉ. सुनीता शेंद्रे या डॉक्टरांच्या पथकाने रात्री एक वाजता या महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करून मातेची वेदनेपासून मुक्तता केली.
आता माता व बाळ सुरक्षित आहे, बाळाचे वजन चार किलो असून मातेने सर्व टीमचे आभार मानले आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेतील हे पथक रक्ताच्या नात्यासारखे धावून आले, अशी भावना मातेने व्यक्त केेली.
0 Comments