बुलडाणा- मराठी साहित्यात आजवर शेतकरी असो की कष्टकरी वर्ग असो त्याचे वर्णन चुकीच्या पद्धतीने आले. आता श्रमिक कष्टकऱ्यांची मुले लिहू लागल्याने हे चित्र बदलत आहे आणि रवींद्र साळवे यांच्या कवितेत तोच प्रतिध्वनी उमटला असून त्यात शेतकरी कष्टकरी वर्गाचे आवाज दिसतो आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक बारोमासकार डॉ. सदानंद देशमुख यांनी केले.
रवींद्र साळवे यांनी लिहिलेल्या 'सम्यक साहित्य दर्शन' (समीक्षाग्रंथ) व 'या निर्णायक काळात' (काव्यसंग्रह) ह्या दोन पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन नुकतेच प्रगती वाचनालयामध्ये झाले यावेळी प्रा. डॉ. सदानंद देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, शेती माती आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाला रवींद्र साळवे यांनी कवितेचा विषय केला आहे. याप्रसंगी अकोला येथील सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. भास्कर पाटील म्हणाले की, मानव मुक्तीचे गुणगान करणारे साहित्य कालातीत असते; व्यवस्थेला शरण जाणारे नसते. रवींद्र साळवे यांच्या कवितेत वर्तमानाचा क्ष किरण दिसतो आहे. या प्रसंगी आंबेडकरी साहित्य अकादमीच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांनीही रवींद्र साळवे यांच्या अल्पाक्षरी शब्दांच्या मुक्तछंदातील कवितावर प्रकाश टाकला.
सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी कवितेइतकाच चित्रातून देखील परिवर्तनाचा विचार मांडता येतो याकडे लक्ष वेधले. कोणताही काळ कवी लेखकासाठी निर्णायक काळच असतो असे सांगितले. नामदेव ढसाळ यांनाही तो काळ निर्णायक वाटला होता. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे संचालन कवी रमेश आराख यांनी केले तर आभार प्रदर्शन नाट्यकलावंत शशिकांत इंगळे यांनी केले. याप्रसंगी प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा सुजाता कुल्ली, प्रा. कि. वा. वाघ, डॉ. इंदुमती लहाने, प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर, डॉ. एस. एम. कानडजे, डॉ. गोविंद गायकी, पंजाबराव गायकवाड, माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, प्रा. डॉ. भगवान गरुडे, एजाज खान एजाज, योगेश देवकर, विशाल मोहिते, अमोल पैठणे, साहित्यिक सुरेश साबळे, सुदाम खरे, रविकिरण वानखडे, डॉ. मंजू जाधव, शुद्दोदन आराख, यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
0 Comments