नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत लीलाबाईंनी साकारला रेशीम शेती उद्योग
बुलडाणा, कृषी विभागा मार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविली जाते. तसेच कृषी विभागाकडून पूरक व्यवसाय करण्यासाठीही विविध योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांचा लाभ घेवून आर्थिक उन्नती साधता येते, हे दाखवून दिले आहे, मेहकर तालुक्यातील चिंचाळा येथील लीलाबाई बाबुसिंग जाधव या महिला शेतकऱ्यानी. पारंपारिक पिके घेवून शेती करणे परवडत नाही, असे म्हणणारे शेतकरी अनेक आहेत. मात्र रेशीम शेतीची वेगळी वाट निवडत उत्पन्नाचा शाश्वत मार्ग गवसणारे शेतकरीही आहेत. श्रीमती लिलाबाई जाधव यांनी हा मार्ग मिळवून दाखविला आहे.
जिल्ह्यातील 441 गावात ही योजना राबविली जात आहे. यामध्ये रेशीम शेती योजनेचा समावेश असून कृषी विभाग आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांचे संयुक्त सहकार्याने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत तुती रोपवाटिका, तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन गृह व संगोपन साहित्य या घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. चिंचाळा येथील श्रीमती लीलाबाई बाबुसिग जाधव यांनी कृषी पर्यवेक्षक श्री धांडे, मेहकर यांचे मदतीने सन 2020-21 मध्ये या योजनेत सहभाग नोंदविला. तुती रोपे खरेदी व लागवडी बाबत मार्गदर्शन जिल्हा रेशीम कार्यालय यांचेकडून सु.प्र.फडके यांनी केले.
त्यांनी चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी 1000 वर्ग फूट आकारमानाचे रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. रेशीम कार्यालयकडून प्रशिक्षण घेतल्यावर त्यांनी पहिली बॅच 200 अंडीपुंजची काढली. माहे ऑगस्ट 2021 मध्ये रेशीम कीटक संगोपन घेण्यास सुरुवात केली. त्यांना गुळवे रेशीम चॉकी केंद्र, बुलडाणा यांचेकडून बाल कीटकांचा पुरवठा करण्यात आला. त्यापासून त्यांना 202.49 किलो ग्रॅम कोष उत्पादन मिळाले. प्रति किलोग्रॅमचा 415 रूपये दर मिळाला. त्यापोटी 84033 रक्कम मिळाली. कमी कालावधीत केवळ 28 दिवसात चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला.
तुती लागवडीचे व्यवस्थापन करून खत, पाणी व मशागत त्यांनी केली. श्रीमती लिलाबाई यांनी 45 दिवसांनी दुसरी बॅच माहे ऑक्टोबर 2021 मध्ये 200 अंडीपुंज ची घेतली. त्यापासून त्यांना 112.47 कि. ग्रॅ. उत्पन्न मिळाले, प्रति किलो 575 रूपये प्रमाणे जालना येथील रेशीम कोष बाजार मध्ये दर मिळाला. त्यापासून 64670 रूपये उत्पन्न मिळाले. कमी खर्चात व कमी कालावधीत हे उत्पन्न पाहून त्यांना हा उद्योग शाश्वत उत्पन्न देणारा वाटला. एखाद्या पगारदारासारखा या उद्योगातून महिन्याला उत्पन्न त्यांना मिळत गेले. त्यांनी तिसरी बॅच 200 अंडीपुंज घेऊन माहे फेब्रुवारी 2022 मध्ये घेतली. त्यापासून 167.43 किलो कोष निर्मिती केली व प्रति किलो 755 रूपये भाव मिळून 126410 रूपये रक्कम मिळाली. एकूण वर्षभरात त्यांनी एक एकर तुती लागवडीच्या रेशीम कोषातून 2 लक्ष 75 हजार 113 रूपयांचे उत्पन्न मिळविले.
त्यांना तुती लागवडीचे 37 हजार 500 रूपये व संगोपन गृहाचे 1 लक्ष 26 हजार 479 रूपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यांनी आता स्व: खर्चाने अजून एक एकर लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी पूरक व्यवसायात रेशीम शेती उद्योग हा शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न कमी कालावधीत मिळवून देणारा व्यवसाय आहे, हे खऱ्या अर्थाने श्रीमती लिलाबाई जाधव यांनी दाखवून दिले आहे.
0 Comments