या वाढत्या धगधगत्या उन्हात आपण घराबाहेर पडलो असता जेव्हा जिवाची लाही लाही होते तेव्हा आपण काहीतरी शोधत असतो ते म्हणजे ' एखादे झाड ',कुठे झाड दिसते काय ? व ते दिसतच आपण त्या झाडाच्या सावलीत उभे राहुन त्या झाडाच्या मायेच्या सावलीचा आसरा घेतो.
आपल्या अकोल्याचे तापमानाचे जगात सर्वाधिक तापमान नोंद होते.आणि आपण अकोलेकरांना त्यावर फार गर्व वाटते आणि त्यावर आपण वेगवेगळे हास्यास्पद वक्तव्य करीत असतो. वास्तविक पाहता आपण या जागतिक तापमानाच्या यादीतून अकोल्याचे नाव कसे कमी करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
पर्यावरण संतुलन बिघडत आहे. रस्त्यांच्या दोन्ही कडांनी वृक्ष लावणे हे शासनाने सक्तीचे करावे जेव्हा आपण रस्ते तयार करतो तेव्हा जे वृक्ष मधात येेतील ते आपण कापताना कशाचाही विचार करीत नाही. कितीतरी झाडांची कत्तल होते. हे करत असतांना च्या कॉन्ट्रॅक्टरला (ठेकेदाराला) आपण रस्ता तयार करायचे काम दिले तसाच अजून एक कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा जेणेकरून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत होईल. एखादं झाड तोडण्याची जर
खूपच आवश्यकता असेल तर एक झाड तोडण्याची आधी दोन झाडे लावण्याचा व जगवण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. मोकळ्या जागेत ओपन स्पेस मध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. फळ देणारी, सावली देणारे वृक्ष तोडून आपण ग्लोबल वॉर्मिंग ला आवाहन देत आहोत.
पर्यावरण संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे पावसाळ्यात प्रत्येक शासकीय, निमशासकीय, शाळा-कॉलेज धार्मिक संस्था , कार्यालय, बँक अशा प्रत्येक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला वृक्ष लागवड हे सक्तीचे करावे जेणेकरून भरपूर प्रमाणात वृक्ष लागवड होईल. व येणाऱ्या असंतुलित नैसर्गिक संकटांना आपल्याला बळी पडण्यापासून वाचू शकेल. शेतकरी बांधवांनी आपल्या शेताच्या धुर्यावर फळ (आंबा यासारखे ) झाडांची लागवड करावी.
झाडे लावण्यासाठी आपण एखाद्या निमित्तचा आधार घेऊ शकतो जसे जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा स्मृती प्रित्यर्थ याकारणाने लावलेली झाडे आपण चांगल्या प्रकारे जगवू व त्यांना आपण तोडणार पण नाही. अश्या अनेक निमित्ताने आपण वृक्षारोपण करू शकतो.
तर आजच संकल्प करा " येणाऱ्या पावसाळ्यात सर्वांनी किमान दोन वृक्ष लावून तेे जगवण्याचा व आपला अकोला जिल्हा हिरवागार करण्याचा. "
सौ. माया प्रदिप ईरतकर , समता परिषद जिल्हा अध्यक्ष अकोला
0 Comments