‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या दशकपूर्तीनिमित्त सायकल रॅली; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा दि. 22: जिल्ह्यातील मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान, तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह यासारख्या अनिष्ठ प्रथाना आळा घालण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आज ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला रवाना केले. यावेळी शाळाचे विद्यार्थी, महिला शिक्षक सहभागी झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, मुलींचा घटता जन्मदर ही एक सामाजिक समस्या असून ती सोडविण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रबोधन, जनजागृती करुन लोकशिक्षण व्हायला हवे. हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य असून समाजाचे संतुलन साधण्यासाठी महिला व पुरुषांचे प्रमाण योग्य हवे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम मर्यादेत कालावधीसाठी न राबविता त्यांची व्यापक स्वरुपात अंमलबजावणी करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ देऊन स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सायकल रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन कारंजा चौक, बोंडे सरकार चौकमार्गे भारत विद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये जिल्हा परिषदचे अधिकारी, कर्मचारी तसेच भारत विद्यालय, प्रबोधनी विद्यालय, शारदा ज्ञानपीढ व एडेड हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेस १० वर्षपूर्तीनिमित्त विविध विभागामार्फत दि. 24 जानेवारी ते 8 मार्चपर्यंत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी दिली.
0 Comments